१०३
१ माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करु दे. २ माझ्या आत्म्या, परमेश्वराचा जयजयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरु नकोस. ३ देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर. तो आमचे सर्व आजार बरे करतो. ४ देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो आम्हांला प्रेम आणि सहानुभूती देतो. ५ देव आम्हाला खूप चांगल्या गोष्टी देतो. तो आम्हाला गरुडासारखे परत तरुण बनवतो. ६ खी झाले आहेत त्यांना देव न्याय देतो, त्यांच्यासाठी देव न्याय आणतो. ७ देवाने मोशेला नियम शिकवले, देव ज्या सामर्थ्यशाली गोष्टी करु शकतो त्या त्याने इस्राएलला दाखवल्या. ८ परमेश्वर सहानुभूतिपूर्ण आणि दयाळू आहे. देव सहनशील आणि प्रेमाचा सागर आहे. ९ परमेश्वर नेहमीच टीका करीत नाही. परमेश्वर आमच्यावर सदैव रागावलेला राहात नाही. १० आम्ही देवाविरुध्द पाप केले पण त्याने आम्हाला त्या पापाला साजेशी शिक्षा केली नाही. ११ देवाचे त्याच्या भक्तांबद्दलचे प्रेम हे स्वर्ग पृथ्वीव रजितक्या उंचीवर आहे तितके आमच्यावर आहे. १२ आणि देवाने आमची पापे पूर्व आणि पश्चिम एकमेकींपासून जितक्या अंतरावर आहेत तितक्या अंतरावर नेऊन ठेवली. १३ वडील मुलांच्या बाबतीत जितके दयाळू असतात तितकाच दयाळू परमेश्वर त्याच्या भक्तांच्या बाबतीत असतो. १४ देवाला आमच्याबद्दल सारे काही माहीत असते. आम्ही धुळीपासून निर्माण झालो आहोत हे देवाला माहीत आहे. १५ आमचे आयुष्य कमी आहे हे देवाला माहीत आहे. त्याला माहीत आहे की आम्ही गवताप्रमाणे आहोत. १६ आम्ही एखाद्या छोट्या रानफुलासारखे आहोत हे देवाला माहीत आहे. ते फूल लवकर वाढते. गरम वारा वाहायला लागला की ते मरते आणि थोड्याच वेळात ते फूल कुठे वाढत होते ते देखील कुणी सांगू शकत नाही. १७ परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहाणार आहे. देव त्यांच्या मुलांशी आणि मुलांच्या मुलांशीदेखील चांगला वागणार आहे. १८ जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. १९ देवाचे सिंहासन स्वर्गात आहे आणि तो सर्वांवर राज्य करतो. २० देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा. देवदूतांनो, तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात. तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळता. २१ परमेश्वराच्या सगळ्या सैन्यांनो देवाची स्तुती करा. तुम्ही त्याचे सेवक आहात. देवाला जे हवे ते तुम्ही करा. २२ परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या. देव चराचरावर राज्य करतो आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.