२
१ परमेश्वर, मोशे व अहरोन यांना म्हणाला, २ “इस्राएल लोकांनी दर्शनमंडपाभोवती आपापले तंबू ठोकावेत; प्रत्येक दलाला आपले स्वत:चे निशाण असावे आणि प्रत्येकाने आपापल्या दलाच्या निशाणाजवळ आपला तंबू ठोकावा. ३ “यहुदावंशाच्या छावणीचे निशाण उगवत्या सूर्याच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असावे. यहुदावंशातील सर्व लोकांनी आपली छावणी त्या निशाणाजवळ ठोकावी. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन हा यहुदावंशाचा प्रमुख सरदार असावा. ४ त्याच्या दलात चौऱ्याहत्तर हजार सहाशे लोक होते. ५ “इस्साखार वंशाच्या लोकांनी यहुदावंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. सुवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखारवंशाचा प्रमुख सरदार असावा. ६ त्याच्या दलात चोपन्न हजार चारशे लोक होते. ७ “जबुलून वंशाच्या लोकांनीही यहुदावंशाच्या छावणीनंतर जवळच आपली छावणी उभारावी. हेलोनाचा मुलगा अलीयाब हा जबुलून वंशाचा प्रमुख सरदार असावा. ८ त्याच्या दलात सत्तावन्न हजार चारशे लोक होते. ९ “यहुदावंशाच्या छावणीत एकूण एक लाख शहाऐंशी हजार चारशे लोक होते. ते त्यांच्या कुळाप्रमाणे विभागलेले होते. इस्राएल लोकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रवास करिताना यहुदावंशाच्या दलाने सर्वात पुढे चालावे. १० “पवित्रनिवास मंडपाच्या दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण असावे. प्रत्येक गटाने आपापल्या निशाणाजवळ आपली छावणी उभारावी. शदेउराचा मुलगा अलीसूरहा रऊबेन वंशाचा प्रमुख सरदार असावा. ११ त्याच्या दलात शेहेचाळीस हजार पाचशे लोक होते. १२ “शिमोन वंशातल्या कुळांनी रऊबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा. १३ त्याच्या दलात एकोणसाठ हजार तीनशें लोक होते. १४ “गादवंशाच्या कुळांनीही रऊबेन वंशाच्या छावणी जवळ आपली छावणी उभारावी. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप हा गाद वंशाचा प्रमुख सरदार असावा. १५ त्याच्या दलात पंचेचाळीस हजार सहाशें पन्नास लोक होते. १६ “रऊबेनच्या छावणीत कुळांप्रमाणे एकंदर एक लाख एकावन्न हजार चारशें पन्नास लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना रऊबेनच्या दलातील लोकांनी दुसऱ्या क्रमांकावर चालावे. १७ “त्यानंतर इस्राएलचे लोक हालल्यावर लेवीच्या लोकांनी मुक्काम हलवावा (यहूदा आणि रऊबेन नंतर) दर्शनमंडप त्यांच्याबरोबर असावा व तो इतर छावण्याच्या लोकांच्या मध्ये असावा. प्रवास करताना छावण्या ज्या क्रमाने निघतात त्याच क्रमाने मुक्काम करताना त्यांनी आपापल्या छावण्या ठोकाव्यात. प्रत्येक माणसाने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ राहावे. १८ “एफ्राइम वंशाच्या छावणीचे निशाण पश्चिम बाजूस असावे व त्याच्या कुळातल्या लोकांनी आपली छावणी तेथे उभारावी. अम्मीहुदाचा मुलगा अलीशामा एफ्राइम वंशाचा प्रमुख सरदार असावा. १९ त्याच्या दलात चाळीस हजार पाचशे लोक होते. २० “मनश्शेवंशाच्या दलाने एफ्राइम वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. पदासुराचा मुलगा गमलीयेल हा मनश्शेवंशाचा प्रमुख सरदार असावा. २१ त्याच्या दलात बत्तीस दोनशें लोक होते. २२ “बन्यामीन वंशाच्या दलानेही एफ्राइमाच्या दलाशेजारी आपली छावणी ठोकावी. बन्यामीन वंशाच्या प्रमुख सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान हा असावा. २३ त्याच्या दलात पस्तीस हजार चारशें लोक होते. २४ “एफ्राइम वंशाच्या छावणीत एकण एक लाख आठ हजार शंभर लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना एफ्राइम वंशाचा तिसरा क्रमांक असावा. २५ “दान वंशाच्या छावणीचे निशाण उत्तरेकडील बाजूस असावे. त्यांच्या कुळातल्या लोकांनी आपल्या दलाची छावणी तेथे उभारावी. अम्मीशादैचा मुलगा अहीयेजर हा दानवंशाचा सरदार असावा. २६ त्याच्या दलात बासष्ट हजार सातशें लोक होते. २७ “आशेर वंशाच्या दलाने दान वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. आक्रानाचा मुलगा पगीयेल हा आशेर वंशाचा सरदार असावा. २८ त्याच्या दलात एकेचाळीस हजार पाचशे लोक होते. २९ “नफताली वंशाच्या कुळांनीही दान वंशाच्या छावणीजवळ आपली छावणी उभारावी. एनानाचा मुलगा अहीरा हा नफताली वंशाचा पुढारी असावा. ३० त्याच्या दलात त्रेपन्न हजार चारशें लोक होते. ३१ “दान वंशाच्या छावणीत एक लाख सत्तावन्न हजार सहाशें लोक होते. इस्राएल लोकांचा तळ ठिकठिकाणाहून हलविताना दानवंशाच्या कुळांनी सर्वात शेवटी चालावे. प्रत्येक माणसाने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ राहावे.” ३२ अशी ही इस्राएल लोकांची मंडळी होती. त्यांच्या वंशात त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची गणती केली तेव्हा त्यांची एकूण संख्या सहा लाख तीन हजार पाचशें पन्नास होती. ३३ मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांबरोबर लेवी लोकांची गणती केली नाही. ३४ तेव्हा परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही इस्राएल लोकांनी केले. प्रत्येक दलाने आपल्या निशाणापाशी तळ दिला आणि प्रत्येक जण आपापल्या कुळात व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांच्या छावणीत राहिला.