६
शब्बाथाचे पालन
१ नंतर असे झाले की, एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात होता आणि त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खात होते. २ मग परूश्यांपैकी काही म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करण्यास योग्य नाही, ते तुम्ही का करता?” ३ येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही काय? ४ तो देवाच्या घरात गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीच खाणे योग्य नाही त्या त्याने कशा घेऊन खाल्ल्या व आपल्याबरोबर जे होते त्यांनाही दिल्या.” ५ आणखी येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.” ६ असे झाले की, दुसऱ्या एका शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि शिकवू लागला. ज्याचा उजवा हात वाळलेला होता असा एक मनुष्य तेथे होता. ७ येशू शब्बाथ दिवशी कोणाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. यासाठी की त्यांना आरोप ठेवण्यासाठी काहीतरी कारण मिळावे. ८ परंतु तो त्यांचे विचार जाणून वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा,” आणि तो मनुष्य उठून तेथे उभा राहिला. ९ येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास विचारतो, शब्बाथ दिवशी कोणत्या गोष्टी करायला परवानगी आहे? चांगले करणे की वाईट करणे? कोणते कायदेशीर आहे, एखाद्याचा जीव वाचवणे का त्याचा नाश करणे?” १० मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहीले आणि म्हणाला, तू “आपला हात लांब कर.” तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. ११ पण परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक खूप रागावले व येशूविषयी काय करता येईल याविषयी आपसात चर्चा करू लागले.
बारा प्रेषित
१२ त्यादिवसात असे झाले की, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. त्याने ती रात्र देवाची प्रार्थना करण्यात घालवली. १३ जेव्हा दिवस उगवला, तेव्हा त्याने शिष्यांना आपणाकडे बोलावले. त्याने त्यांच्यातील बाराजणांना निवडले व त्यांना ‘प्रेषित’ असे नाव दिले. १४ शिमोन ज्याला पेत्र हे सुद्धा नाव दिले तो अंद्रिया (पेत्राचा भाऊ), याकोब आणि योहान, फिलिप्प, बर्थलमय, १५ मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन ज्याला जिलोत म्हणत, १६ याकोबचा पुत्र यहूदा व यहूदा इस्कर्योत, जो पुढे विश्वासघात करणारा निघाला.
१७ तो त्यांच्याबरोबर डोंगरावरून खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला आणि त्याच्या अनुयायांचा मोठा समुदाय तेथे आला व यहूदीया प्रांत, यरुशलेम शहर, सोर आणि सिदोनच्या समुद्रकिनाऱ्याकडचे असे पुष्कळसे लोक तेथे आले होते. १८ ते तेथे त्याचे ऐकण्यास व आपल्या रोगांपासून बरे होण्यास आले व ज्यांना अशुद्ध आत्म्यांची बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधीपासून मुक्त करण्यात आले. १९ सगळा लोकसमुदाय त्यास स्पर्श करू पाहत होता, कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते आणि सर्वांना ते बरे करत होते.
धन्यवाद व दुःखोद्गार
२० मग येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला, अहो दिनांनो, तुम्ही धन्य आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
२१ अहो जे तुम्ही आता भूकेले आहात, ते तुम्ही धन्य आहात, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे तुम्ही आता रडता, ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही हसाल.
२२ जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा व्देष करतील आणि जेव्हा ते आपल्या समाजातून तुम्हास दूर करतील व तुमची निंदा करतील व तुमचे नाव ते वाईट म्हणून टाकून देतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हास नाकारतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात.
२३ त्यादिवशी आनंद करून उड्या मारा, कारण खरोखर स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे! कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना सुद्धा तसेच केले.
२४ पण श्रीमंतानो, तुम्हास दुःख होवो कारण तुम्हास अगोदरच सर्व सुख मिळाले आहे.
२५ जे तुम्ही तृप्त आहात त्या तुम्हास दुःख होवो, कारण तुम्ही भूकेले व्हाल. जे आता हसतात त्यांना दुःख होवो कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.
२६ जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हास दुःख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच केले.
शत्रूंवर प्रेम
२७ परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा व्देष करतात, त्यांचे चांगले करा. २८ जे तुम्हास शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. २९ जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्यास तुमची बंडी ही घेऊन जाण्यास मना करू नका. ३० जे तुम्हास मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमची वस्तु हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको. ३१ आणि जसे मनुष्यांनी तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा.
३२ तुमच्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती करा, तर त्यामध्ये तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. ३३ तुमचे जे चांगले करतात, त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा असेच करतात. ३४ ज्यांच्याकडून तुम्हास परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात. ३५ परंतु तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रीती करा व त्यांचे बरे करा आणि निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल कारण तो अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे. ३६ जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.
इतरांचे दोष काढण्याबाबत
३७ दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हास दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल. ३८ द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास परत मापून देण्यात येईल.
३९ त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकेल काय? ते दोघेही खड्डयात पडणार नाहीत काय? ४० कोणताही शिष्य त्याच्या गुरुपेक्षा थोर नाही. पण प्रत्येक शिष्य जेव्हा पूर्ण शिकतो तेव्हा तो गुरुसारखाच होतो. ४१ स्वतःच्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? ४२ अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ मगच तुला तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढताना चांगले दिसेल.
४३ कोणतेही चांगले झाड नाही की जे वाईट फळ देते किंवा कोणतेही वाईट झाड नाही की जे चांगले फळ देते. ४४ कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरुन ओळखले जाते. लोक काटेरी झुडुपातून अंजीरे गोळा करीत नाहीत तसेच काटेरी झुडुपातून ते द्राक्षे गोळा करीत नाहीत. ४५ चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठवलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंतःकरणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.
ऐकणे आणि करणे
४६ तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणता, पण जे मी सांगतो ते तुम्ही का करीत नाही? ४७ प्रत्येकजण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्या आज्ञा पाळतो तो कसा आहे हे मी तुम्हास दाखवितो. ४८ तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला आणि पाण्याचा लोंढा घरावर आदळला, पण पाण्याने ते हलले नाही, कारण ते चांगले बांधले होते. ४९ पण जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही तो ज्याने आपले घर पाया न घालता जमिनीवर बांधले त्या मनुष्यासारखा आहे, त्या घरावर पाण्याचा लोंढा आदळला आणि ते लागलेच पडले व त्या घराचा मोठा नाश झाला.”