१७
येशूची प्रार्थना
१ या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. २ जे तू त्यास दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्यास सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस. ३ सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. ४ जे तू काम मला करावयाला दिलेस ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. ५ तर आता, हे माझ्या पित्या, हे जग होण्याआधी तुझ्याबरोबर मला जे गौरव होते त्याच्यायोगे तू आपणा स्वतःबरोबर माझे गौरव कर.
६ जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले. ते तुझे होते आणि ते तू मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. ७ आता त्यांना समजले आहे की, तू ज्या गोष्टी मला दिल्यास त्या सर्व तुझ्यापासून आहेत. ८ कारण तू मला जी वचने दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली, मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवले. असा त्यांनी विश्वास ठेवला. ९ त्यांच्यासाठी मी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत. १० जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते सर्व माझे आहे आणि त्यांच्याठायी माझे गौरव झाले आहे. ११ आणि आता, यापुढे मी जगात नाही; पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. १२ जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. १३ पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्याठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो. १४ मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा व्देष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. १५ तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो. १६ जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. १७ तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे. १८ जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आहे. १९ आणि त्यांनीही सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला पवित्र करतो.
२० मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या शब्दावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो २१ की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये (एक) व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा. २२ तू जे गौरव मला दिले आहे, ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे; २३ म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये; यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि, त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली.
२४ हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी असेन तेथे माझ्याजवळ असावे, यासाठी की, जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे; कारण जगाचा पाया घातला त्यापुर्वी तू माझ्यावर प्रीती केली. २५ हे “न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे. २६ मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि मी कळवीन, यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”