४४
१ यिर्मयाला परमेश्वराचा संदेश मिळाला. मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांसाठी तो होता. हे लोक मिग्दोल, तहपनहेस, मेमफिस व दक्षिण मिसर येथे राहत होते. संदेश असा होता: २ सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यरुशलेम नगरीवर व यहूदाच्या इतर नगरांवर मी जी भयंकर संकटे आणली, ती तुम्ही पाहिलीत. आता ती नगरे म्हणजे नुसती दगडधोंड्यांची रास झाली आहेत. ३ तेथे राहणाऱ्या लोकांनी पाप केल्यामुळे मी त्यांचा नाश केला. त्यांनी अनेक दैवतांना बळी अर्पण केले. त्यामुळे मला राग आला. तुमच्या लोकांनी व पूर्वजांनी, पूर्वी कधी, त्या दैवतांना पुजले नव्हते. ४ मी त्या लोकांकडे माझे संदेष्टे पुन्हा पुन्हा पाठविले ते माझे सेवक होते. त्या संदेष्ट्यांनी माझा संदेश सांगितला आणि ते लोकांना म्हणाले, ‘अशी भयंकर कृत्ये करु नका. परमेश्वर मूर्तीपूजेचा तिरस्कार करतो.’ ५ पण त्यांनी संदेष्ट्यांचे ऐकले नाही. त्यांनी संदेष्ट्यांकडे लक्ष दिले नाही. ते दुष्कृत्ये करीतच राहिले ते दैवतांना बळी अर्पण करीतच राहिले. ६ म्हणून त्यांच्यावरचा माझा राग मी व्यक्त केला. मी यहूदातील नगरांना व यरुशलेमच्या मार्गांना शिक्षा केली. माझ्या रागामुळेच आज यरुशलेम व यहूदातील नगरे नुसती दगडविटांच्या राशी झाली आहेत.” ७ म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मूर्तीची पूजा करीत राहून तुम्ही स्वत:लाच इजा का करुन घेत आहात? तुम्ही पुरुष व स्त्रिया, मुले व बाआलके यांना यहूदाच्या कुळापासून तोडत आहात. त्यामुळे यहूदाच्या कुळातील कोणीही शिल्लक राहणार नाही. ८ मूर्तीपूजा कुरुन तुम्ही मला का संतापवता? आता तुम्ही मिसरमध्ये राहात आहात आणि मिसरच्या दैवतांना बळी अर्पण करुन तुम्ही मला संतापवत आहात. तुम्ही तुमचाच नाश करुन घ्याल. ती तुमचीच चूक असेल. तुमचे वागणेच असे असेल की दुसऱ्या राष्ट्रांतील लोक तुमच्याबद्दल वाईटच बोलतील. जगातील इतर राष्ट्रे तुमची चेष्टा करतील. ९ तुमच्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये तुम्ही विसरलात का? यहूदाच्या राजा राण्यांनी केलेली वाईट कृत्ये तुम्हाला आठवत नाहीत का? तुम्ही आणि तुमच्या बायकांनी यहूदात व यरुशलेमच्या रस्त्यावर केलेली पापे तुम्ही विसरलात का? १० आजतागायत यहूदातील लोक नम्र झालेले नाहीत त्यांनी माझ्याबद्दल आदर दाखविलेला नाही. ते, माझ्या शिकणुकीप्रमाणे वागले नाहीत. मी तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना घालून दिलेले नियम त्यांनी पाळले नाही.” ११ म्हणून सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “मी तुमच्यावर भयंकर संकटे आणण्याचे ठरविले आहे. मी यहूदाच्या कुळाचा संपूर्ण नाश करीन. १२ यहूदातील अगदी थोडे लोक वाचले आहेत. ते येथे मिसरला आले आहेत. पण यहूदातील कुळातल्या त्या वाचलेल्या लोकांचा मी नाश करीन. अती महत्वाच्या व्यक्तीपासून अती सामान्यपर्यंत सर्वच्या सर्व युद्धात ठार होतील वा उपासमारीने मरतील. इतर राष्ट्रांतील लोक त्यांची निंदा करतील. त्या लोकांच्या बाबतीत जे घडले, ते पाहून इतर राष्ट्रांतील लोक घाबरतील. ते लोक म्हणजे जणू काय शिवी बनतील, दुसरी राष्ट्रे त्यांचा अपमान करतील. १३ मिसरमध्ये राहण्यास गेलेल्या त्या लोकांना मी शिक्षा करीन. त्यासाठी मी तलवार, उपासमार व भयंकर रोगराई या गोष्टींचा उपयोग करीन. यरुशलेम नगरीला जशी मी शिक्षा केली, तशीच त्यांना शिक्षा करीन. १४ यहूदातून वाचून मिसरमध्ये राहण्यास गेलेला एकही जण माझ्या शिक्षेतून सुटणार नाही. त्यांच्यातील कोणीही यहूदास परतणार नाही. त्या लोकांची यहूदात परत येऊन राहण्याची इच्छा आहे, पण काही निसटून गेलेले लोक सोडून कोणीही यहूदात परत जाणार नाही.” १५ मिसरमध्ये राहणाऱ्या यहूदी स्त्रिया, दैवतांना बळी अर्पण करीत होत्या, त्यांच्या पतींना ते माहीत होते. पण त्यांनी त्या स्त्रियांना असे करण्यापासून परावृत्त केले नाही. तेथे असलेल्या यहूदी लोकांचा एक मोठा समुदाय एकत्र येत होता. हे लोक मिसरच्या दक्षिण भागात राहात होते. ज्या स्त्रिया दैवतांना बळी अर्पण करीत होत्या, त्यांचे पती यिर्मयाला म्हणाले. १६ “तू आम्हाला सांगितलेला परमेश्वराचा संदेश आम्ही मानणार नाही १७ आम्ही स्वर्गातील राणीला बळी अर्पण करण्याचे वचन दिले आहे, तेव्हा आम्ही त्याप्रमाणेच करु. आम्ही बळी व पेयार्पण करुन तिची पूजा करु. आम्ही पूर्वीही हे केले आहे. आमच्या पूर्वजांनी, राजांनी व अधिकाऱ्यांनीही पूर्वी असेच केले. आम्ही सर्वांनी यहूदाच्या नगरांत आणि यरुशलेमच्या रस्त्यावर हेच केले. आम्ही स्वर्गातील राणीची पूजा केली तेव्हा आम्हाला अन्नाची कमतरता नव्हती, आम्हाला यश होते, आमचे काहीही वाईट झाले नाही. १८ पण आम्ही स्वर्गातील राणीला बळी व पेयार्पणे करुन तिची पूजा करण्याचे सोडून देताच आम्हाला अडचणी आल्या, आमचे लोक तलवारीने व उपासमारीने मारले गेले.” १९ मग स्त्रिया बोलू लागल्या, त्या यिर्मयाला म्हणाल्या, “जे काही आम्ही करीत होतो, ते आमच्या पतींना माहीत होते. स्वर्गातील राणीला बळी व पेयार्पण करण्याची त्यांची आम्हाला परवानगी होती. आम्ही पुऱ्यांमधून तिच्या प्रतिमा घडवीत होतो, हेही त्यांना माहीत होते.” २० मग ह्या सर्व गोष्टी सांगणाऱ्या स्त्री पुरुषांशी यिर्मया बोलला २१ तो त्या लोकांना म्हणाला, “तुम्ही यहूदाच्या नगरांत आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर बळी दिले हे परमेश्वराच्या लक्षात आहे. तुम्ही, तुमच्या पूर्वजांनी, राजांनी, अधिकाऱ्यांनी व देशातील लोकांनी असेच केले परमेश्वराच्या लक्षात हे सर्व होते. त्याने त्याबद्दल विचार केला. २२ मग परमेश्वराची सहनशक्ती संपली. तुम्ही केलेल्या वाईट आणि भयंकर कृत्यांचा परमेश्वराला तिरस्कार वाटला. म्हणून त्याने तुमच्या देशाचे ओसाड वाळवंट केले. तेथे आता कोणीही राहत नाही. तो देश आता शापरुप झाला आहे. २३ तुम्ही दैवतांना बळी अर्पण केले, म्हणूनच असे वाईट घडले, तुम्ही परमेश्वराविरुध्द वागून पाप केले. तुम्ही परमेश्वराचे ऐकले नाही. त्याच्या शिकवणुकीप्रमाणे तुम्ही वागला नाहीत अथवा त्याने घालून दिलेले नियम तुम्ही पाळले नाहीत करारातील तुमच्या शर्ती तुम्ही पाळल्या नाहीत.” २४ यिर्मया त्या सर्वांना म्हणाला, “यहूदातून येऊन मिसरमध्ये राहणाऱ्या तुम्ही सर्वांनी परमेश्वराचा संदेश ऐका: २५ सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव म्हणतो, ‘तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले. तुम्ही म्हणाला “आम्ही दिलेले वचन पाळू. आम्ही स्वर्गातील राणीला बळी व पेये अर्पण करण्याचे वचन दिले आहे.” तर मग जा दिलेल्या वचनाप्रमाणे वागा दिलेले वचन पाळा. २६ पण मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांनो परमेश्वराचा संदेश ऐका मी माझ्या महान नावाची शपथ घेऊन वचन देतो की मिसरमध्ये राहणाऱ्या यहूदी लोकांपैकी कोणीही पुन्हा कधीही वचन देताना, माझी शपथ घेणार नाहीत ते पुन्हा कधीही “देवा शपथ.” असे म्हणणार नाही. २७ “ ‘मी त्या यहूदाच्या लोकांवर लक्ष ठेवत आहे, पण ते काळजी घेण्यासाठी म्हणून नाही, तर त्यांना इजा व्हावी म्हणून. मिसरमध्ये राहणारे यहूदी लोक उपासमारीने मरतील वा तलवारीने मारले जातील. त्यांचा संपूर्ण नाश होईपर्यंत हे मरणाचे सत्र चालूच राहील. २८ काही लोक तलवारीच्या वारातून निसटतील ते मिसरमधून यहूदाला परत येतील पण असे लोक फारच थोडे असतील. मग वाचलेल्या व मिसरमध्ये राहायला आलेल्या लोकांना कोणाचे शब्द खरे ठरले ते कळेल. ‘माझे शब्द खरे ठरले की त्यांचे’ ते त्यांना समजेल. २९ मी तुम्हाला ह्याचा पुरावा देईन.’ हा परमेश्वराचा संदेश आहे, ‘मी मिसरमध्येच तुम्हाला शिक्षा करीन. मग तुम्हाला दुखविण्याची वचने दिली होती ती खरी ठरतात, ह्याची तुम्हाला खात्री पटेल. ३० मी म्हटल्याप्रमाणे करतो हाच तुमच्यासाठी पुरावा असेल.’ परमेश्वर पुढे म्हणतो, ‘फारो हफ्रा हा मिसरचा राजा आहे. त्याचे शत्रू त्याला मारायला टपले आहेत. मी फारो हफ्राला त्याच्या शत्रूंच्या ताब्यात देईन. सिद्कीया यहूदाचा राजा होता नबुखदनेस्सर त्याचा शत्रू होता, मी सिद्कीयाला त्याच्या शत्रूच्या ताब्यात दिले त्याचप्रमाणे फारो हफ्राला मी त्याच्या शत्रूच्या ताब्यात देईल.”