१०
१ इस्राएलच्या वंशजांनो, परमेश्वर तुमच्याविषयी काय म्हणतो ते ऐका. २ परमेश्वर असे म्हणतो,“दुसऱ्या देशांतील लोकांचे अनुकरण करु नका. आकाशात दिसणाऱ्या काही खास गोष्टींना घाबरु नका. या आकाशातील गोष्टी बघून दुसरे देश घाबरतात. परंतु तुम्ही अजिबात घाबरु नका. ३ त्या लोकांच्या चालीरीती अर्थशून्य आहेत. त्यांच्या मूर्ती म्हणजे दुसरे काही नसून जंगलातील लाकडे आहेत कामगार लाकूड पटाशीने छिनून त्या मूर्ती बनवितो. ४ ते लोक, त्या मूर्ती चांदीसोन्याने मढवून त्यांना सुंदर रुप देतात. त्या खाली पडू नयेत म्हणून हातोड्याने खिळे मारुन घट्ट बसवितात. ५ इतर देशांतील अशा मूर्ती काकडीच्या मळ्यातील बुजगावण्यासारख्या आहेत. त्या बोलू शकत नाहीत वा चालू शकत नाहीत. लोकांनाच त्या वाहून न्याव्या लागतात. तेव्हा त्यांना घाबरु नका. त्या मूर्ती तुमचे वाईटही करु शकत नाहीत व चांगलेही करु शकत नाहीत.” ६ परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तू महान आहेस. तुझ्या नावातच मोठेपण व सामर्थ्य आहे. ७ परमेश्वर, प्रत्येक माणसाने तुझा आदर केला पाहिजे. तू सर्व राष्ट्रांचा राजा आहेस. म्हणूनच सर्वाना आदरणीय आहेस त्या राष्ट्रांमध्ये काही शहाणी माणसे जरुर आहेत पण तुझ्या इतके सुज्ञ कोणीही नाही. ८ दुसऱ्या देशातील लोक मतिमंद आणि मूर्ख आहेत. दीड दमडीच्या लाकडाच्या मूर्ती त्यांना उपदेश करतात. ९ ते लोक तार्शिशहून आणलेल्या चांदीचा आणि उफाजहून आणलेल्या सोन्याचा वापर करुन पुतळे बनवितात. ह्या मूर्ती सुतार आणि सोनार घडवितातत्या मूर्तीवर ते निळ्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे चढवितात ‘शहाणे लोक’ असे ‘देव’ तयार करतात. १० पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे. खरा सजीव असा केवळ देवच आहें शाश्वत शासन करणारा असा तो राजा आहें त्याला राग आल्यास पृथ्वी कंप पावते. त्याचा कोप देशांतील लोक सहन करु शकत नाहीत. ११ परमेश्वर म्हणतो, “त्या लोकांना पुढील संदेश द्या. ‘त्या खोट्या देवांनी पृथ्वीची आणि स्वर्गाची निर्मिती केली नाही. ते स्वर्ग आणि पृथ्वीवरुन नाहीसे होतील.” १२ ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली असा एकमेव देवच आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन त्याने जग निर्माण केलें आपल्या समंजसपणाच्या आधारे पृथ्वीवर आकाश पांघरले. १३ ढगांचा गडगडाट आणि आकाशातून पडणारा मुसळधार पाऊस ही देवाचीच करणी आहे. पृथ्वीच्या प्रत्येक भागावरील आकाशात तो मेघ पाठवितो. पावसाबरोबर वीज पाठवितो. आपल्या भांडारातून वारा आणतो. १४ लोक अगदी मूर्ख आहेत. आपण निर्माण केलेल्या मूर्तीमुळेच सोनार मूर्ख बनविले जातात. त्या मूर्ती म्हणजे फक्त असत्य आहे. ते फक्त थोतांडचआहे १५ त्या मूर्ती शून्य किंमतीच्या आहेत. त्या खोट्या आहेत, न्यायदानाच्या वेळी त्यांचा नाश होईल. १६ पण याकोबचा देव त्या मूर्तीसारखा नाही. त्याने सर्व गोष्टींची निर्मिती केली आणि इस्राएलच्या वंशजांची, स्वत:चे खास लोक म्हणून निवड केली. “सर्वशक्तिमान परमेश्वर” हेच देवाचे नाव. १७ आपल्या मालकीच्या सर्व चीजवस्तू घेऊन पळून जाण्याच्या तयारीत राहा. यहूदाच्या लोकांनो, शत्रूने तुमच्या शहराला वेढले असून तुम्ही आता अडकला आहात. १८ परमेश्वर म्हणतो, “यावेळी, मी यहूदाच्या लोकांना ह्या देशा बाहेर घालवून देईन. मी त्यांना त्रास देऊन दु:ख भोगण्यास भाग पाडीन म्हणजे त्यांना धडा मिळेल.” १९ अरेरे, मी (यिर्मया) फारच जखमी झालो. माझ्या जखमा भरुन येण्यासारख्या नाहीत. तरीसुद्धा मी स्वत:लाच सांगतो, “हे माझे दु:ख मला पूर्णपणे भोगलेच पाहिजे.” २० माझ्या तंबूचा नाश झाला. तंबूचे सर्व दोर तुटले आहेत. माझी मुले मला सोडून निघून गेली आहेत. माझा तंबू उभारायला एकही माणूस उरला नाही. माझा निवारा बांधायला एकही माणूस शिल्लक नाही. २१ मेंढपाळ (नेते) मूर्ख आहेत. ते परमेश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत. ते शहाणे नाहीत. त्यामुळे त्यांचे कळप (लोक) इतस्तत: विखरुन हरवले आहेत. २२ मोठा आवाज ऐका! तो आवाज उत्तरेकडून येत आहे; यहुदातील शहरांचा तो नाश करील. युहदाचे निर्जन वाळवंट होईल. तेथे कोल्ह्यांची वस्ती होईल. २३ परमेश्वरा, माणसाच्या आयुष्यावर त्याचा स्वत:चा खरा हक्क नसतो, हे मला माहीत आहे. लोक भविष्याच्या योजना खरोखरच ठरवू शकत नाहीत. २४ परमेश्वरा, आम्हाला सुधार!पण न्याय्य रीतीने सुधार! रागाच्या भरात आम्हांला शिक्षा करु नकोस. नाही तर तू कदाचित् आमचा नाश करशील. २५ तुला राग आला असेल, तर दुसऱ्या राष्ट्रांना शिक्षा कर. ते तुला जाणत नाहीत वा मान देत नाहीत. ते तुझी उपासना करीत नाहीत. त्या राष्ट्रांनी याकोबच्या कुटुंबाचा विनाश केला. त्यांनी इस्राएल नेस्तनाबूत केले आणि इस्राएलच्या भूमीचा नाश केला.