५
दबोरा आणि बाराक यांचें गित १ त्या दिवशीं दबोरा आणि अबीनवामाचा मुलगा बाराक ह्यांनीं गाइलेलें गीत हें; २ इस्त्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषानें पुढें आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा. ३ राजेहो, ऐका; अधिपतींनो लक्ष द्दा, मी स्वतः परमेश्वराला गाईन; इस्त्राएलाचा देव परमेश्वर ह्याचीं स्तोत्रें गाईन. ४ हे परमेश्वरा, तूं सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशांतून कूच केलेस, तेव्हां पृथ्वी कपायमान झाली; तसेंच आकाशानें जलबिंदु गाळले; मेघांनींहि जलबिंदु गाळले; ५ परमेश्वरासमोर डोंगर थरथरां कांपले, इस्त्राएलाचा देव परमेश्व ह्याच्यासमोर हा सीनाय देखील थरारला. ६ अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्याकाळी, याएलेच्या काळीं राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गानीं प्रवास करीत. ७ मी दबोरा पुढें येईपर्यंत, इस्त्राएलांत माता म्हणून मी प्रसिध्द होईपर्यंत, इस्त्राएलांत कोणी नेते उरले नव्हते; ८ लोकांनीं नवे नवे देव निवडले. तेव्हां वेशीवेशींतून संग्राम झाला; इस्त्राएलांतील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय? ९ माझें मन इस्त्राएलाच्या अधिपतींकडे लागलें आहे. ते लोकांबरोबर स्वसंतोषानें पुढें आले; तुम्हीं परमेश्वराचा धन्यवाद करा. १० शुभ्र गर्दभांवर स्वारी करणा-यांनो, अमूल्य गालिच्यांवर बसणा-यांनो, वाटेनें चालणा-यांनो, ह्याचें गुणगान करा. ११ पाणवठ्यांवर पाणक्यांच्या स्वरानें परमेश्वराच्या विजयाचें, इस्त्राएलांतील नेत्यांच्या विजयाचें लोक वर्णन करतात. त्यासमयीं परमेश्वराचे प्रजाजन वेशींवर चालून गेले. १२ जागी हो, जागी हो दबोरे; जागी हो, जागी हो, गीत गा; बाराका ऊठ; अबीनवामाच्या मुला, तूं आपल्या बंदिवानांना घेऊन जा. १३ त्या समयीं उरलेले सरदार खालीं उतरले; परमेश्वराचे लोक माझ्याकरिता वीरांविरूध्दं सामना करावयास उतरले. १४ अमालेकांत ज्यांचीं पाळेंमुळें पसरली आहेत ते एफ्राइमामधून आले; तुझ्यामागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला; माखीराहून अधिपति व जबुलूनाहून दंडधारी अमलदार उतरून आले. १५ इस्त्राखाराचे सरदार दबोरेबरोबर होते; इस्त्राखार बाराकाशीं एकनिष्ठ होता; त्याच्या पाठोपाठ ते खो-यांत धावले. रऊबेंनाच्या पक्षांमध्ये मोठी चर्चा झाली. १६ खिल्लारांसाठीं वाजविलेला पांवा ऐकत तूं मेंढवाड्यांत कां बसलास? रऊबेनाच्या पक्षांविषयी फार विचार-विनिमय झाला. १७ गिलाद यार्देनेपलीकडेच राहिला; दान हा आपल्या जहाजांपाशींच कां बसून राहिला? आशेर समुद्रकिना-यावर बसुन राहिला, आपल्या धक्क्यांवर बसुन राहिला. १८ जबुलून व नफताली ह्या लोकांनीं आपल्या प्रांतांतील उंचवट्यांवर मृत्यूची पर्वा न करतां आपला जीव धोक्यांत घातला. १९ राजे येऊन लढले, त्या समयीं कनानाचे राजे मगिद्दोच्या जलप्रवाहांपाशीं तानख येथें लढले; त्यांना रूप्याची कांहींच लूट मिळाली नाही. २० आकाशांतून तारे लढले; त्यांनीं आपआपल्या कक्षांतून सीसराशीं लढाई केली. २१ कीशोन नदीनें, त्या पुरातन नदीनें, त्या कीशोन नदीनें त्यांना वाहून नेलें. हे जीवा, हिंमत धरून पुढें चाल. २२ त्यासमयीं घोडे भरधांव उधळलें ते मस्त घोडे टापा आपटूं लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला. २३ परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्दा त्यांतल्या रहिवाश्यांना मोठा शाप द्दा; कारण परमेश्वराला साहाय्य करावयास, वीरांविरूध्द परमेश्वराला साहाय्य करावयास ते आले नाहींत. २४ केनी हेबेर ह्यांची स्त्री याएल ही सगळया स्त्रियांमध्ये धन्य। डे-यांत राहणा-या सर्व स्त्रियांमध्यें ती धन्य। २५ त्यानें पाणी मागितलें तों तिनें त्याला दूध दिलें; श्रीमंतांना साजेल अशा वाटींत तिनें त्याला दहीं आणून दिलें. २६ तिनें आपला एक हात मेखेला, आणि उजवा हात कारागिराच्या हातोडयाला घातला; तिनें हातोडयानें सीसराला मारलें, त्याचें डोकें फोडून टाकलें, त्याचें कानशील मेख ठोकून आरपार विंधले. २७ तिच्या पायाखालीं तो वाकला, पडला, निश्चल झाला; तिच्या पायांपाशीं तो वाकला, पडला; जेथें तो वाकला तेथेंच तो मरून पडला. २८ सीसराच्या आईनें खिडकींतून बाहेर डोकावलें, तिनें जाळींतून हाक मारली, त्याचा रथ यावयाला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथांच्या चाकांना कोणी खीळ घातली? २९ तिच्या चतुर सख्यांनीं तिला उत्तर दिलें, हो, स्वतः तिनेंच आपणास उत्तर दिलें; ३० त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एकएक किंवा दोन दोन कुमारिका; सीसरासाठी रंगीबेरंगी वस्त्रें, भरजरी रंगीबेरंगी वस्त्रें लूटींत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यांत भूषण म्हणून पांघरण्यासाठी रंगीबेरंगी वस्त्रें मिळाली नसतील ना? ३१ हे परमेश्वरा, तुझे सर्व शस्त्रु असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापानें उद्य पावणा-या सूर्यासमान होवोत. मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.