१३
अधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळण्याविषयी सूचना
१ प्रत्येक मनुष्याने आपल्यावर असलेल्या अधिकाराऱ्यांच्या अधीन रहावे, कारण देवाकडून नाही असा अधिकारी नाही; आणि जे आहेत ते देवाकडून नेमलेले आहेत. २ म्हणून जो अधिकाऱ्याला विरोध करतो तो देवाच्या योजनेला विरोध करतो आणि जे प्रतिकार करतील ते स्वतःवर दोष आणवतील. ३ कारण चांगल्या कामात अधिकार्‍यांची भीती नाही पण वाईट कामात असते; मग तुला अधीकाराऱ्यांची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे काय? चांगले ते कर आणि तुला त्यांच्याकडून प्रशंसा मिळेल. ४ कारण तुझ्या चांगल्यासाठी तो देवाचा सेवक आहे; पण तू जर वाईट करीत असलास तर भय धर, कारण तो विनाकारण तरवार धरीत नाही कारण तो वाईट करणार्‍यांवर क्रोध व्यक्त करण्यास सूड घेणारा देवाचा सेवक आहे. ५ म्हणून तुम्ही केवळ क्रोधासाठी नाही, पण तसेच विवेकासाठी अधीन राहणे अगत्य आहे. ६ या कारणास्तव तुम्ही करही देता कारण याच गोष्टींत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत. ७ म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या; ज्याला कर त्यास कर, ज्याला जकात त्यास जकात, ज्याला आदर त्यास आदर, ज्याला मान त्यास मान.
बंधुप्रेम
८ तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, ह्याशिवाय कोणाचे देणेकरी असू नका कारण जो दुसर्‍यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे. ९ कारण ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको’ आणि अशी दुसरी कोणतीही आज्ञा असेल तर ‘तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर’ या एका वचनात ती समावलेली आहे. १० प्रीती आपल्या शेजार्‍याचे काही वाईट करीत नाही; म्हणून प्रीती ही नियमशास्त्राची परिपूर्ती आहे.
ख्रिस्तदिनाचे आगमन
११ आणि हे आताच समय ओळखून करा, कारण आताच तुमची झोपेतून उठण्याची घटका आली आहे कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आपले तारण अधिक जवळ आले आहे. १२ रात्र सरत आली असून दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधारातली कामे टाकून प्रकाशातली शस्त्रसामग्री परिधान करू या. १३ दिवसा शोभेल असे चालू या. दंगलीत व धुंदीत किंवा अमंगळपणात व कामातुरपणात किंवा कलहात व ईर्ष्येत राहू नये. १४ तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त परिधान करा आणि देहवासनांसाठी काही तरतुद करू नका.