२२
१ माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? तू इतका दूर आहेस की मला मदत करु शकणार नाहीस. तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत. २ माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस आणि मी रात्रीही तुला हाका मारणे चालूच ठेवले. ३ देवा, पवित्र असा केवळ तूच आहेस तू राजा म्हणून बसतोस तूच इस्राएलची प्रशांसा आहेस. ४ आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस. ५ देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी बोलावले आणि त्यांची शत्रूंपासून सुटका झाली. त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला पण त्यांची निराशा झाली नाही. ६ म्हणून मी कीटक आहे का? मी मनुष्य नाही का? लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात. ७ माझ्याकडे जो बघतो तो माझा उपहास करतो. ते त्यांचे डोके हलवतात आणि जीभ बाहेर काढून मला वेडावून दाखवतात. ८ ते मला म्हणतात “तू परमेश्वराला तुला मदत करायला सांग. कदाचित् तो तुला मदत करेल. तू जर त्याला इतका आवडत असशील तर कदाचित् तो तुझी सुटका करेल.” ९ देवा, हे सत्य आहे की मी ज्याच्यावर अवलंबून राहावे असा फक्त तूच आहेस. मी जन्मल्यापासून तू माझी काळजी घेत आला आहेस. मी माझ्या आईचे दूध पीत होतो तेव्हापासून तू मला आश्वासन दिले आहेस. आणि माझे सांत्वन केले आहेस. १० मी जन्माला आलो त्या दिवसापासून तू माझा देव आहेस मी माझ्या आईच्या शरीरातून बाहेर आलो तेव्हापासून तू मला तुझ्या छत्राखाली आणले आहेस. ११ तेव्हा देवा मला सोडू नकोस, संकटे जवळ आली आहेत आणि मला मदत करायला कोणीही नाही. १२ माझ्याभोवती लोक आहेत ते बळकट बैलासारखे माझ्या चहू बाजूला आहेत. १३ प्राण्यांवर गुरगुर करणाऱ्या वत्यांना फाडणाऱ्या सिंहासारखे त्यांचे तोंड उघडे आहे. १४ माझी शक्ती जमिनीवर सांडलेल्या पाण्यासारखी नाहीशी झाली आहे, माझी हाडे वेगवेगळी झाली आहेत माझे धैर्यही नाहीसे झाले आहे. १५ फुटलेल्या खापरा प्रमाणे माझे तोंड सुकले आहे. माझी जीभ टाळूला चिकटली आहे. तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले. आहेस. १६ “कुत्री” माझ्या भोवती आहेत मला दुष्टांच्या घोळक्यांनी सापळ्यात पकडले आहे सिंहाप्रमाणे त्यांनी माझ्या हातापायालाजखमा केल्या आहेत. १७ मला माझी हाडे दिसू शकतात. लोक माझ्याकडे टक लावून पाहतात आणि पाहातच राहतात. १८ ते माझे कपडे त्यांच्यात वाटून टाकतात आणि माझ्या लांब झग्यासाठी त्यांनी जिठ्या टाकल्या आहेत. १९ परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तूच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर. २० परमेश्वरा माझे आयुष्य तलवारी पासून वाचव माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांपासून वाचव. २१ सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर. २२ परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझ्याबद्दल सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन. २३ जे लोक परमेश्वराची उपासना करतात त्यांनी त्याची स्तुतीही करावी. इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराला मान द्या. इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा. २४ का? कारण परमेश्वर संकटात सापडलेल्या गरीब लोकांना मदत करतो. परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही. परमेश्वर त्यांचा तिरस्कार करत नाही. जर लोकांनी परमेश्वराला मदतीसाठी बोलावले तर तो त्यांच्यापासून लपून बसणार नाही. २५ परमेश्वरा, मोठ्या सभेतले माझे गुणगान तुझ्यापासूनच आले. त्या सगळ्या भक्तांसमोर मी ज्या ज्या गोष्टींचे वचन दिले त्या सर्व मी करीन. २६ गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील. जे लोक परमेश्वराला शोधत आहे, त्यांनी त्याची स्तुती करावी. तुमचे ह्दय सदैव आनंदी राहो. २७ दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो. आणि ते परमेश्वराकडे परत येवोत. सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत. २८ का? कराण परमेश्वराच राजा आहे तो सगळ्या देशांवर राज्य करतो. २९ बलवान व निरोगी लोक भोजन करुन देवापुढे नतमस्तक झाले आहेत. तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतमस्तक होतील. ३० आणि भविष्यात आपले वंशज परमेश्वराची सेवा करतील. लोक त्याच्याविषयी सर्वकाळ सांगत राहातील. ३१ परमेश्वराने खरोखरच ज्या चांगल्या गोष्टी केल्याआहेत त्या विषयी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला सांगेल.