३५
१ परमेश्वर मोशेशी बोलला. हे मवाबमधील यार्देनच्या खोऱ्यात यहीहोसमोर यार्देन नदीजवळ घडले. परमेश्वर म्हणाला, २ “इस्राएल लोकांना सांग की त्यांनी त्यांच्या भागातील काही शहरे लेवी लोकांना दिली पाहिजेत. इस्राएल लोकांनी काही शहरे आणि त्याच्या आजूबाजूची कुरणे लेवी लोकांना दिली पाहिजेत. ३ लेवी लोक त्या शहरात राहू शकतील आणि लेवी लोकांच्या गायी आणि इतर जनावरे शहराभोवतालच्या कुरणात चरु शकतील. ४ तुम्ही तुमच्या प्रदेशातील किती भाग लेवी लोकांना देणार? ५ शहरांच्या तटबंदीपासून 1500 फूट भाग लेवी लोकांच्या मालकीचा असेल. 3000 फूट पूर्वेला आणि 3000 हात दक्षिणेला, 3000 हात फश्चिमेला आणि 3000 हात उत्तरेपर्यंतची जागा लेवींना मिळेल. (शहर या सर्व प्रदेशाच्या मध्यभागी असेल) ६ त्यापैकी सहा शहरे शरणपुरे असतील. जर एखाद्या माणसाने चुकून कुणाला मारले तर तो माणूस संरक्षणासाठी त्या शहरात जाऊ शकतो. त्या सहा शहरांखेरीज आणखी 42शहरे तुम्ही लेवींना द्या. ७ म्हणजे तुम्ही एकूण 48 शहरे लेवींना द्या. त्या शहरांभोवतालची जमीनही तुम्ही लेवींना द्या. ८ इस्राएलच्या मोठ्या कुटुंबांना जमिनीचे मोठे तुकडे मिळतील आणि लहान कुळांना लहान तुकडे मिळतील. म्हणून मोठी कुळे जास्त शहरे आणि लहान कुळे थोडी शहरे लेवींना देतील.” ९ नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, १० “लोकांना या गोष्टी सांग: तुम्ही लोक यार्देन नदी पार करुन कनानच्या प्रदेशात जाल. ११ तेव्हा तुम्ही शरणपुरे निवडा. जर एखाद्याने चुकून कुणाला ठार मारले तर तो संरक्षणासाठी त्यापैकी एखाद्या शहरात जाऊ शकतो. १२ तेथे तो माणूस बदला घेणाऱ्या मृत माणसाच्या कुटुंबियांपासून सुरक्षित राहू शकतो. त्या माणसाचा कोर्टात न्याय होईपर्यंत तो तेथे सुरक्षित राहू शकतो. १३ अशी 6 संरक्षक शहरे असतील. १४ यापैकी तीन शहरे यार्देन नदीच्या पूर्वेला असतील आणि तीन शहरे कनानच्या प्रदेशात यार्देन नदीच्या पश्चिमेला असतील. १५ ही शहरे इस्राएलच्या नागरिकांसाठी, परदेशी नागारिकासाठी आणि प्रवाशांसाठी शरणपुरे असतील. यांच्यापैकी कुणीही चुकून कुणाला ठार मारले तर ते संरक्षणसाठी या शहरात जाऊ शकतात. १६ “जर एखादा माणूस कुणाला मारण्यासाठी लोखंडी शस्त्राचा उपयोग करत असेल तर त्याने मेले पाहिजे. १७ आणि जर एखाद्याने दगड घेऊन कुणाला मारले तर त्यानेसुध्दा मेले पाहिजे. (पण त्या दगडाचा आकार एखाद्याला मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडाएवढा असला पाहिजे.) १८ आणि जर एखादा माणूस कुणाला मारण्यासाठी लाकडाच्या तुकड्याचा उपयोग करीत असेल तर तो माणूस सुद्धा मेला पाहीजे. (हा लाकडाचा तुकडा म्हणजे सामान्यत: कोणाला तरी मारण्यासाठी उपयोगात आणतात तसे लाकडाचे शस्त्र असले पाहिजे.) १९ मेलेल्या माणसाच्या कुटुंबातील कुणीही त्या खुन्याचा पाठलाग करुन त्याला ठार मारू शकतो. २० “माणूस एखाद्याला हाताने मारून सुद्धा ठार मारू शकतो. किंवा एखाद्याला ढकलून देऊन सुद्धा ठार मारू शकतो. किंवा कुणाला काही फेकून मारून सुद्धा त्याला ठार करु शकतो. २१ जर कुणी ते हेतूपूर्वक द्वेषबुद्धीने केले असेल तर तो खुनी ठरतो. त्या माणसाला ठार मारलेच पाहिजे. मेलेल्या माणसाच्या कुटुंबातील कुणीही त्या खुन्याचा पाठलाग करुन त्याला मारु शकतो. २२ “एखादा माणूस अपघाताने दुसऱ्याला मारू शकेल. मेलेल्या माणसाचा त्याने द्वेष केला नाही त्याला त्याने चुकून मारले असेल. किंवा त्याने एखादी वस्तू चुकून फेकली असेल आणि ती चुकून एखाद्याला लागून तो मेला-तर त्याने ते विचारपूर्वक केले असे नाही. २३ किंवा एखाद्या माणसाने दगड फेकला आणि तो त्याला न दिसलेल्या माणसाला लागला व तो मेला तर त्या माणसाने योजनापूर्वक मारले असे नाही. तो माणूस मेलेल्या माणसाचा द्वेष करत नव्हता. तो केवळ योगायोगाने मेला. २४ जर असे घडले तर काय करायचे ते समाजाने ठरवायचे. मेलेल्या माणसाच्या कुटुंबातील एखादा माणूस त्याला मारु शकतो की नाही ते लोक न्यायालयाने ठरवायचे. २५ जर लोकांनी खुन्याचे त्या कुटुंबापासून रक्षण कराचये असे ठरवले तर समाजाने खुन्याला संरक्षक शहरात परत न्यावे आणि जोपर्यंत मुख्य याजक मरत नाही तोपर्यंत खुन्याने तिथेच रहावे. २६ “त्या माणसाने संरक्षक शहराच्या बाहेर जायचे नाही. जर त्याने त्या सीमा ओलांडल्या २७ आणि मृत माणसाच्या कुटुंबाने त्याला पकडले आणि मारले तर त्या कुटुंबातील तो माणूस खुनाचा अपराधी ठरणार नाही. २८ एखाद्या माणसाने चुकून कोणाला मारले असेल तर त्याने मुख्य याजक मरेपर्यंत शरणपुरातच राहिले पाहिजे. मुख्य याजक मेल्यानंतर तो माणूस त्याच्या स्वत:च्या प्रदेशात जाऊ शकतो. २९ तुम्हा लोकांच्या सर्व शहरांमध्ये हाच नियम सदैव लागू राहील. ३० “मारणाऱ्याला मरणाची शिक्षा जर साक्षीदार असेल तरच दिली जाईल. जर एकच साक्षीदार असेल तर कोणालाही मरणाची शिक्षा दिली जाणार नाही. ३१ जर एखादा माणूस खुनी असेल तर त्याला मारलेच पाहिजे. पैसे घेऊन त्याची शिक्षा बदलू नका. त्या खुन्याला मारलेच पाहिजे. ३२ “जर एखाद्याने कुणाला मारले आणि तो संरक्षक शहरात पळून गेला तर घरी जाण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेऊ नका. मुख्य याजक मरेपर्यंत त्याने शरणापुरातच राहिले पाहिजे. ३३ “तुमच्या प्रदेशाला निष्पाप रक्ताने भ्रष्ट करु नका जर एखाद्याने कुणाचा खून केला तर त्या अपराधासाठी असलेली एकमेव शिक्षा म्हणजे त्या खुन्याला ठार मारणे. त्याशिवाय त्याप्रदेशाची त्या अपराधपासून सुटका होऊच शकत नाही. ३४ मी परमेश्वर आहे. मी तुमच्या देशांत इस्राएल लोकांबरोबर राहीन. मी तिथे राहणार आहे. म्हणून ती जागा निष्पाप लोकांच्या रक्ताने अशुद्ध करु नका.”