७
१ ईयोब म्हणाला:“मनुष्याला पृथ्वीवर खूप धडपड करावी लागते. त्याचे आयुष्य मजुराच्या आयुष्यासारखे असते. २ गुलामाप्रमाणे माणसालाही उन्हातान्हात काम केल्यानंतर थंडगार सावलीची गरज भासते. माणूस काम केल्यानंतर पगाराच्या दिवसाची वाट वघणान्या मजुराप्रमाणे आहे. ३ महिन्या मागून महिने निराशेत निघून गेले. माझ्या वाट्याला रात्रीमागून रात्र कष्टाचीच आली. ४ मी झोपी जाण्याच्या वेळी विचार करतो उठण्यासाठी किती वेळ आहे याचा आणि रात्र संपतच नाही. सूर्य उगवेपर्यंत मी या कुशीवरुन त्या कुशीवर तळमळत असतो. ५ माझे शरीर किड्यांनी आणि घार्णीनी भरलेले आहे. माझी कातडी सोलवटलेली आणि वाहत्या जखमांनी भरलेली आहे. ६ “माझे दिवस विणकऱ्याच्या मागापेक्षा भरभर जातात आणि माझे आयुष्य आशेशिवाय संपते. ७ देवा, माझे आयुष्य म्हणजे केवळ श्र्वास आहे हे आठव. मी पुन्हा कधीही काही चांगले पाहणार नाही. ८ आणि तुम्ही मला पुन्हा कधीही पाहणार नाही. तुम्ही मला शोधाल तेव्हा मी गेलेला असेन. ९ ढग दिसेनासा होतो आणि निघून जातो. त्याचप्रमाणे माणूस मरतो आणि थडग्यात पुरला जातो. तो पुन्हा कधीही परत येत नाही. १० तो त्याच्या जुन्या घरात कधीही परत येणार नाही. त्याचे घर त्याला ओळखणार नाही. ११ “तेव्हा मी गप्प बसणार नाही. मी बोलेन. माझ्या आत्म्याला क्लेश होत आहेत. माझा आत्मा अगदी कडू जहर झाला आहे म्हणून मी तक्रार करीन. १२ देवा, तू माझ्यावर पाहारा का करीत आहेस? मी समुद्र आहे की त्यातला अक्राळ विक्राळ प्राणी? १३ माझे अंथरुणच मला स्वस्थता देऊ शकेल. माझा बिछानाच मला विश्रांती आणि स्वास्थ्य देईल. १४ पण देवा, मी जेव्हा स्वस्थ पडतो तेव्हा तू मला भयानक स्वप्नांनी घाबरवतोस. आणि तुझ्या दृष्टांतांनी मला भय वाटते. १५ म्हणून जगण्यापेक्षा गुदमरुन मरणे मी पसंत करतो. १६ मी माझ्या जीवनाचा तिरस्कार करतो. मी आशा सोडून दिली आहे. मला जगण्याची आसक्ती नाही. मला एकटा सोडून दे. माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. १७ देवा, माणूस तुला इतका महत्वाचा वाटतो? तू त्याला इतका आदर का दाखवावास? तू त्याची दखल तरी का घेतोस? १८ तू त्याला रोज सकाळी का भेटतोस? आणि क्षणाक्षणाला त्याची परीक्षा का घेतोस? १९ देवा, तू एक क्षणभरही माझ्यावरची तुझी नजर वळवीत नाहीस. तू मला एक क्षणही एकटा सोडीत नाहीस. २० देवा, तू लोकांवर नजर ठेवतोस. मी पाप केले असले तरी मी आता काय करु शकतो? तू मला तुझे लक्ष्य का बनवत आहेस? मी तुझ्यासाठी एक समस्या बनलो आहे का? २१ तू मला माझ्या पापाबद्दल क्षमा का करुन टाकीत नाहीस? मी लवकरच मरेन आणि माझ्या थडग्यात जाईन. तू नंतर माझा शोध घेशील पण मी गेलेला असेन.”