४७
१ योसेफ फारोकडे जाऊन म्हणाला, “माझा बाप माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी कनानातून त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे सर्वकाही घेऊन येथे आले आहेत. ते हल्ली गोशेन प्रांतात आहेत.” २ योसेफाने आपल्याबरोबर फारोसमोर जाण्यासाठी आपल्या भावांपैकी पाच जणांची निवड केली. ३ फारो त्या भावांना म्हणाला, “तुम्ही काय धंदा करता?” ते भाऊ म्हणाले, “महाराज, आम्ही आपले दास मेढपाळ आहोत; आमच्या आधी आमचे पूर्वजही मेंढपाळच होते.” ४ ते फारोला पुढे म्हणाले, “कनान देशात फारच भयंकर व कडक दुष्काळ पडला आहे. तेथे एकाही शेतात आमच्या कळपासाठी हिरवे गवत किंवा हिरवा चारा नाही म्हणून आम्ही ह्या देशात राहण्यास आलो आहोत; महाराज आम्ही आपणास नम्र विनंती करतो की आम्हास कृपा करुन गोशेन प्रांतात राहू द्यावे.” ५ मग फारो योसेफाला म्हणाला, “तुझा बाप व तुझे भाऊ तुझ्याकडे आले आहेत. ६ त्यांना राहण्याकरिता तू मिसरमधील कोणतेही ठिकाण निवड; त्यांना उत्तम जमीन असलेला प्रदेश दे. त्याना गोशेन प्रांतात वस्ती करुन राहू दे; आणि ते जर तरबेज व कुशल मेंढपाळ असतील तर मग त्यांनी माझ्या गुराढोरांचीही काळजी घ्यावी.” ७ मग योसेफाने आपल्या बापाला फारोच्या समोर येण्यास सांगितले. तेव्हा याकोबाने फारोस आशीर्वाद दिला. ८ मग फारोने याकोबाला विचारले, “तुमचे वय किती आहे?” ९ याकोबाने उत्तर दिले, “मला फक्त थोडे परंतु कठिण आणि दु:खी असे जीवन लभले आहे व ते मला त्रासदायक व दु:खदायक असे झाले; मला फक्त एकशेतीस वर्षांचे आयुष्य मिळाले परंतु माझे पूर्वज माझ्यापेक्षा अधिक वर्षांच जीवन जगले.” १० याकोबाने फारोला आशीर्वाद दिला व मग तो फारोपुढून निघून गेला. ११ योसेफाने फारोचे म्हणणे मानले व त्याने आपल्या बापाला व भावांना मिसरमधील सर्वात उत्तम भूमीचा रामसेस नगरजवळील प्रांत त्यांना राहावयास दिला. १२ आणि त्याने आपला बाप, आपले भाऊ व त्यांच्या घरचे सर्व यांना भरपूर अन्नसामग्री पुरवली. १३ त्यावेळी दुष्काळ तर फारच कडक झाला. देशात अन्नधान्य कोठेच मिळेना; त्यामुळे मिसर व कनान देश या वाईट परिस्थितीमुळे हवालदील झाले. १४ लोकांनी अधिकात अधिक धान्य विकत घेतले; योसेफाने धान्य विक्रीचे पैसे साठवून फारोच्या वाड्यात आणले. १५ काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले. त्यांच्या जवळचे सर्व पैसे अन्नधान्य विकत घेण्यात खर्च झाल्यामुळे त्यांच्याकडे शिल्लक काहीच राहिले नाही. त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “महाराज! कृपा करुन आम्हाला धान्य द्या! आमचे सर्व पैसे संपले आहेत; आम्हाला जर काही खावयास मिळाले नाही तर तुमच्या डोळ्यादेखत आम्ही मरुन जाऊ.” १६ परंतु योसेफ म्हणाला, “तुम्ही मला तुमची गुरेढोरे द्या म्हणजे मग मी तुम्हाला धान्य देईन.” १७ तेव्हा लोकांनी त्याच्याकडील गुरेढोरे शेरडेमेंढरे, घोडे, गाढवे आणि इतर जनावरे देऊन अन्नधान्य विकत घेतले; आणि त्या वर्षात लोकांकडून गुरेढोरे घेऊन त्यांच्या बदल्यात योसेफाने त्यांना अन्नधान्य दिले. १८ परंतु त्याच्या नंतरच्या वर्षात लोकांच्यापाशी असलेली गुरेढोरेही संपली व अन्नधान्य विकत घेण्यास त्यांच्या जवळ काहीही राहिले नाही; म्हणून मग लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “महाराज! आपणास माहीत आहे की आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत आणि आमची गुरेढोरेही तुमची झाली आहेत; तेव्हा आमच्याकडे आता आपणास दिसतात ती फक्त आमची शरीरे व आमची जमीन या शिवाय दुसरे काहीही राहिलेले नाही. १९ आता मात्र आपण बघत असताना आम्ही नक्की मरुन जाऊ; परंतु जर आपण आम्हास अन्नधान्य द्याल तर मग आम्ही आमची जमीन फारोला देऊ आणि आम्ही त्याचे गुलाम होऊ; कृपा करुन आम्हाला बियाणे द्या म्हणजे आम्ही ते पेरु; मग मात्र आम्ही जगू, मरणार नाही; आणि आमची जमीन आम्हांस धान्य देईल.” २० तेव्हा मिसरमधील सर्व शेतजमीनी योसेफाने फारोकरिता विकत घेतल्या; मिसरच्या लोकांनी आपल्या शेतजमिनी योसेफाला विकल्या कारण दुष्काळ भयंकर तीव्र झाला होता. २१ मिसरमधील सर्व लोक फारोचे गुलाम झाले. २२ योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी मात्र विकत घेतल्या नाहीत. फारो याजकांना त्यांच्या कामाबद्दल पगार देत होता; त्या पैशातून ते आपणासाठी अन्नधान्य विकत घेत असत म्हणून त्यांच्यावर आपल्या जमिनी विकण्याची वेळ आली नाही. २३ तेव्हा योसेफ लोकांना म्हणाला, “पाहा, मी फारोकरिता तुम्हाला तुमच्या जमिनीसकट विकत घेतले आहे; तर मी आता तुम्हाला बियाणे देतो; ते तुम्ही शेतात पेरा; २४ मग हंगामाच्या वेळी तुमच्या उत्पन्नातील पांचवा हिस्सा फारोला दिलाच पाहिजे; बाकीचे चार हिस्से तुम्ही तुमच्याकारिता घ्यावेत. त्यातून पुढच्या वर्षाकरिता तुम्ही बियाणे ठेवावे व बाकीच्या धान्याचा तुमच्या घरातील लहानथोरांस खाण्यासाठी उपयोग करावा.” २५ लोक म्हणाले, “महाराज, आपण आम्हाला वाचवले आहे म्हणून फारोचे गुलाम होण्यात आम्हाला आनंद आहे.” २६ त्यावेळी मग योसेफाने देशासाठी एक कायदा केला, तो आजपर्यंत चालू आहे; त्या कायद्याप्रमाणे जमिनीच्या उत्पन्नचा पाचवा भाग फारोचा आहे. फारो मिसरमधील सर्व जमिनीचा मालक आहे; फक्त याजकांची जमीन फारोच्या मालकीची नाही. २७ इस्राएल (याकोब) मिसरमध्ये गोशेन प्रांतात राहिला. त्याची संतती खूप वाढली व त्यांची भरभराट झाली; त्यांना मिसरमधील जमीन मिळाली व त्यांनी वतने केली आणि तेथे त्यांचे सर्वकाही चांगले झाले. २८ याकोब मिसरमध्ये सतरा वर्षे राहिला तेव्हा तो एकशे सत्तेचाळीस वर्षांचा झाला. २९ दिवस वाढत गेले तसे इस्राएलाने (याकोबाने) जाणले की आता आपण लवकर मरणार, म्हणून मग त्याने आपला मुलगा योसेफ याला आपणाजवळ बोलावले; तो म्हणाला, “तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर माझ्या मांडिखाली तुझा हात ठेवून मला वचन दे की मी जे सांगतो ते तू करशील आणि तू माझ्याशी खरेपणाने वागशील. जेव्हा मी मरेन तेव्हा मला मिसरमध्ये पुरु नको; ३० तर मला मिसरमधून बाहेर घेऊन जा व माझ्या पूर्वजांना जेथे पुरले आहे तेथे म्हणजे आपल्या वंशजांसाठी घेतलेल्या कबरस्तानात मला मूठमाती दे.” योसेफाने उत्तर दिले, “बाबा! तुम्ही मला जे करावयास सांगितले ते मी नक्की करीन असे वचन देतो.” ३१ मग याकोब म्हणाला, “तू माझ्याशी तशी शपथ वाहा;” तेव्हा तसे करण्याबद्दल योसेफाने शपथ वाहिली; मग इस्राएलाने (याकोबाने) आपले डोके मागे पलंगाच्या उशाकडे नम्रतेने लववून नमन केले.