३
जवळ येऊन ठेपलेली संकटे
१ परंतु शेवटच्या काळामध्ये संकटाचा दिवस आपल्यावर येईल हे समजून घे. २ लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदा करणारी, आई-वडीलांची आज्ञा न मानणारी, अनुपकारी, अधार्मिक ३ इतरांवर प्रीती न करणारी, क्षमा न करणारी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी. ४ विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील; ५ ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. ६ मी हे म्हणतो कारण त्यांच्यांपैकी काही घरात शिरकाव करतात व पापाने भरलेल्या, सर्व प्रकारच्या वाईट अभिलाषांनी भरलेल्या, कमकुवत स्त्रियांवर ताबा मिळवतात. ७ अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत. ८ यान्नेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा, ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व विश्वास अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी माणसे आहेत. ९ ते पुढे अधिक प्रगती करणार नाहीत कारण जसा त्यांचा मूर्खपणा प्रकट झाला तसा यांचा मूर्खपणा सर्वांना प्रकट होईल.
संकटापासून बचाव
१० तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीती, माझी सहनशीलता, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे, ही ओळखून आहेस, ११ अंत्युखिया, इकुन्या आणि लुस्र या शहरांमध्ये ज्या गोष्टी माझ्याबाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मी सोसला ते माझे दुःख तुला माहीत आहे, परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले. १२ खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल. १३ पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील. १४ पण तुझ्याबाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्यावर तुझा विश्वास आहे त्या तू तशाच धरून राहा. १५ तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. १६ प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे. १७ यासाठी की, देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.