४
खोटे शिक्षण देणाऱ्याविषयी
१ देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील, २ ज्या मनुष्यांची सद्सदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्यांकडे लक्ष देतील. ३ ते लोकांस लग्न करण्यास मना करतील व जे अन्न विश्वास ठेवणाऱ्यांनी व खरेपण जाणणाऱ्यांनी उपकारस्तुती करून स्वीकारावी म्हणून देवाने अस्तित्वांत आणली ती वर्ज्य करावी असे सांगतील. ४ तर देवाने अस्तित्वात आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले असता काहीही वर्ज्य नाही. ५ कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.
६ जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. ७ परंतु वृद्ध स्त्रियांच्या आवडत्या अमंगळपणाच्या कथांचा स्वीकार करू नकोस, तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर. ८ कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे. ९ हे वचन विश्वसनीय आहे जे सर्वदा स्वीकारावयास योग्य आहे. १० याकरिता आम्ही श्रम व खटपट करतो कारण जो सर्व लोकांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे.
तीमथ्याचा खाजगी जीवनक्रम व शिक्षण
११ या गोष्टी आज्ञारूपाने सांग आणि शिकव. १२ कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, (आत्म्यात) विश्वासात, शुद्धपणांत, विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो. १३ मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, याकडे लक्ष्य लाव. १४ तुझ्यावर वडीलवर्ग हात ठेवण्याचा वेळेस संदेशाच्या द्वारे देण्यात आलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नको. १५ या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यामध्ये पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांस दिसून यावी. १६ आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे चुकीच्या शिक्षणापासून बचाव करशील.