4
सोने कसे निस्तेज झाले आहे पाहा!
चांगले सोने कसे बदलले आहे बघा!
रत्ने सगळीकडे पसरली आहेत.
रस्त्याच्या नाक्या-नाक्यावर ती विखुरली आहेत.
सियोमच्या लोकांची किंमत भारी आहे.
ते आपल्या वजनाचे मोल सोन्यात ठरवितात.
पण आता शत्रू त्यांना मातीच्या जुन्या रांजणांप्रमाणे मानतो.
कुंभाराने केलेल्या मडक्याप्रमाणे तो त्यांना किंमत देतो.
राजकुत्रेसुध्दा आपल्या पिल्लांना भरवितात.
कोल्हीही आपल्या पिल्लांना दुध देते.
पण माझ्या लोकांची कन्या दुष्ट आहे.
त्या वाळवंटात राहणाऱ्या शहामृगाप्रमाणे आहेत.
तान्ह्या मुलांची जीभ तहानेने
टाळ्याला चिकटली आहे.
बालके भाकरी मागतात.
पण त्यांना कोणीही भाकरी देत नाही.
एकेकाळी ज्यांनी पौष्टिक अन्न खाल्ले,
तेच आता रस्त्यावर मरत आहेत.
जे चांगल्या, लाल कपड्यात वाढले,
ते आता कचऱ्याच्या ढिगांतून मिळेल ते उचलतात.
माझ्या लोकांच्या मुलीचे पाप मोठे होते.
सदोम व गमोरा यांच्यापेक्षाही
ते पाप मोठे होते.
सदोमचा व गमोराचा अचानक नाश झाला,
आणि त्यात कोठल्याही माणसाचा हात नव्हता.
यहुदातील काही लोकांनी
एका विशेष प्रकारे आपले जीवन देवाला वाहिले होते.
ते फार शुध्द होते.
ते हिमापेक्षा शुभ्र होते.
दुधापेक्षा पांढरे होते.
त्यांची कांती पोवळयांप्रमाणे लाल होती.
त्यांच्या दाढ्या म्हणजे
जणू काही तेजस्वी इंद्रनीलच.
पण आता त्यांचे चेहरे काजळीपेक्षा काळे झाले आहेत.
त्यांना रस्त्यांत कोणी ओळखतसुध्दा नाही.
त्यांची कातडी सुरकुतली आहे.
लाकडाप्रमाणे शुष्क होऊन ही हाडाला चिकटली आहे.
उपासमारीने मरण्यापेक्षा तलवारीने मेलेले बरे!
कारण उपासमार झालेले फारच दु:खी होते.
ते व्याकुळ झाले होते.
शेतामधून काहीच न मिळाल्यामुळे ते मेले.
10 त्या वेळी, प्रेमळ बायकांनीसुध्दा आपली मुले
शिजविली ती मुलेच त्यांच्या आयांचे अन्न झाले.
माझ्या लोकांचा नाश झाला.
तेव्हा असे घडले.
11 परमेश्वराने आपला सगळा क्रोध प्रकट केला.
त्यांने आपला सगळा राग बाहेर काढला.
त्याने सियोनमध्ये आग लावली
त्या आगीत पायापर्यंत सियोन बेचिराख झाले
12 जगातील राजे, जे घडले
त्यावर विश्वास ठेवू शकले नाहीत.
पृथ्वीवरील लोकांचा ह्यावर
विश्वास बसला नाही.
यरुशलेमच्या प्रवेशद्वारांतून शत्रू
येऊ शकेल ह्यवर कोणाचाच विश्वास बसला नाही.
13 यरुशलेमच्या संदेष्ट्यांनी पाप केले,
धर्मगुरुंनी दुष्कृत्ये केली,
लोकांनी प्रामाणिक माणसांचे रक्त यरुशलेममध्ये सांडले,
म्हणूनच असे घडले.
14 संदेष्टे आणि याजक आंधळयांप्रमाणे रस्त्यात भटकत होते.
ते रक्ताने माखले होते.
कोणीही त्यांच्या वस्त्रालाही शिवू शकले नाहीत
कारण ती रक्ताने भरली होती.
15 लोक ओरडले, “लांब व्हा! दूर ब्ह!
आम्हाला शिवू नका.”
ते लोक इकडे तिकडे भटकले कारण त्यांना घरे नव्हती.
दुसऱ्या राष्ट्रांतील लोक म्हणाले,
“त्यांनी आमच्याबरोबर राहू नये असेच आम्हाला वाटते.”
16 परमेश्वराने स्वतः त्या लोकांचा नाश केला.
त्याने त्यांची अजिबात काळजी घेतली नाही.
त्यांने याजकांना मानले नाही
त्यांने यहुदातील वृध्दांना दया दाखवली नाही.
17 मदतीची वाट पाहून आमचे डोळे थकले आहेत.
पण कोठूनही मदत मिळत नाही.
आमचेरक्षण करण्यास एखादे राष्ट्र येत आहे का,
ह्यची आम्ही बुरुजावरुन टेहळणी केली.
पण एकही देश आमच्याकडे आला नाही.
18 सर्वकाळ, आमच्या शत्रूंनी आमची शिकार केली.
आम्ही रस्त्यांवरसुध्दा जाऊ शकलो नाही.
आमचा शेवट जवळ आला! आमचे आयुष्य सरले होते!
आमचा अंत आला!
19 आमचा पाठलाग करणारे
गरुडापेक्षाही वेगवान होते.
त्यांनी आमचा डोंगरांत पाठलाग केला.
आम्हाला पकडण्यासाठी ते वाळवंटात दडून बसले.
20 आमच्या दृष्टीने राजा सर्वश्रेष्ठ होता.
तो आमचा श्वास होता.
पण त्यांनी राजाला सापळ्यात पकडले.
प्रत्यक्ष परमेश्वरानेच राजाची निवड केली होती.
राजाबद्दल आम्ही असे म्हणालो होतो,
“आम्ही त्याच्या सावलीत राहू.
तो इतर राष्ट्रांपासून आमचे रक्षण करतो.”
 
21 अदोमच्या लोकांनो, आनंदित व्हा.
ऊस देशात राहणाऱ्यांनो, हर्षित व्हा.
पण लक्षात ठेवा की परमेश्वराच्या क्रोधाचा प्याला तुमच्याकडेसुध्दा येईल.
तुम्ही जेव्हा त्यातील पेय (शिक्षा) प्याल,
तेव्हा झिंगाल आणि विवस्त्र व्हाल.
22 सियोन, तुझी शिक्षा संपली.
आता पुन्हा तुला कैद करुन नेले जाणार नाही.
पण अदोमवासीयांनो, तुमची पापे उघडी करुन
परमेश्वर तुम्हाला शिक्षा करील.