17
1 “यज्ञात अर्पण करायचा गोऱ्हा किंवा मेंढरु यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा तिटकारा आहे.
2 “तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या प्रदेशात राहायला लागल्यावर एखाद्या नगरात दृष्कृत्ये घडल्याचे तुमच्या कानावर येईल. परमेश्वराच्या कराराचा भंग केल्याचे पाप एखाद्या बाईच्या किंवा पुरुषाच्या हातून झाल्याचे कळेल. परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध
3 त्याने इतर दैवतांची पूजा केली, किंवा सूर्य, चंद्र, तारे यांना देवपण दिले अशा स्वरुपाचे ते असेल. मी जी परमेश्वराची आज्ञा तुम्हाला दिली त्याच्या हे विरुद्ध आहे.
4 अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची बालंबाल खात्री झाली पाहिजे. हे खरे असल्याचे सिद्ध झाले
5 तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मगारा.
6 त्या व्यक्तिच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका.
7 प्रथम साक्षीदारांनी मारायला हात उचलावा, मग इतरांनी मारावे. अशाप्रकारे आपल्यामधून अमंगळपणा निपटून काढावा.
8 “एखादे खुनाचे प्रकरण, दोन व्यक्तीमधील वाद, किंवा मारामारीत एखादा जखमी होणे अशा सारख्या काही खटल्यांमध्ये न्यायानिवाडा करणे तुम्हाला आवाक्या बाहेरचे वाटेल. या वादांची सुनावणी चाललेली असताना उचित काय ते ठरवणे न्यायाधीशांना जड जाईल. अशा वेळी परमेश्वराने निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जावे.
9 तेथे लेवी वंशातील याजक व त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्या. या समस्येची सोडवणूक ते करतील.
10 परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी ते आपला निर्णय तुम्हाला सांगतील. त्यांचे म्हणणे ऐकून तसे करा. ते जे जे करायला सांगतील ते ते सर्व कुचराई न करता अंमलात आणा.
11 त्यांचा निवाडा शिरोधार्य मानून त्यांच्या सूचनांमध्ये काडीमात्र बदल न करता त्यांच्या सूचना पाळा.
12 “जो याजकाचे व न्यायाधीशाचे ऐकणार नाही त्याला चांगले शासन करा. त्याला मृत्युदंड द्या. इस्राएलमधून या नीच माणसाचे उच्चाटन करा.
13 हे ऐकून इतरांना दहशत बसेल व घाबरुन ते पुढे उन्मत्तपणा करणार नाहीत.
14 “तुमचा देव परमेश्वर देत असलेल्या प्रदेशात तुम्ही जात आहात. त्याचा ताबा घेऊन तुम्ही तेथे राहाल. मग इतर राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा असे तुम्हाला वाटेल.
15 तेव्हा परमेश्वराने निवड केलेल्या व्यक्तिची तुम्ही राजा म्हणून नेमणूक करा. राजा हा तुमच्यापैंकीच असला पाहिजे, परदेशी असता कामा नये.
16 त्याने स्वतःसाठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, ‘तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये,’ असे परमेश्वराने बजावले आहे.
17 तसेच त्याला बऱ्याच बायका असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये.
18 “राज्य करायला लागल्यावर त्याने स्वतःसाठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्या जवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे.
19 नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे व अशा रीतीने परमेश्वर देवाचा आदर ठेवावा.
20 म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्याला स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो व त्याचे वंशज इस्राएलांवर दीर्घकाळ राज्य करतील.